खामगाव (बुलढाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील अंत्रज येथे विवाहितेचा छळ, मारहाण व जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अवघ्या ४० मिनिटांत अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश अरुण वानखडे (वय ३६, रा. अंत्रज) याच्याविरुद्ध खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २००/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीने विवाहितेला मानसिक व शारीरिक त्रास देत मारहाण केली तसेच धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
ही घटना १२ जून रोजी रात्री सुमारे १२.३० वाजता अंत्रज येथे घडली. याप्रकरणी पहाटे ३.५३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पहाटे ४.३४ वाजता आरोपीला अटक केली.
आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत कलम ७४, ७५, ७८, ३३३, ३५२ व ३५१(२)(३) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अटकेची माहिती आरोपीचे काका रमेश जानुजी वानखडे यांना देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (एएसआय) भगवान काळबागे करीत असून त्यांनीच अटकेची कारवाई केली. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत.













