चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): हिंदू सूर्य, शौर्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या महाराणा प्रताप सिंह यांच्या जयंतीनिमित्त चिखली शहरात भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवानिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि एक नंबर म्हणून ओळखला जाणारा साई बँड, म्हसावद प्रथमच बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहरात येत असल्याने महाराणा प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराणा प्रताप जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष आकर्षण म्हणून साई बँडच्या दणदणीत सादरीकरणाची पर्वणी चिखलीकरांना अनुभवता येणार आहे.
या भव्य आणि ऐतिहासिक उत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी जिल्हाभरातील तसेच परिसरातील सर्व महाराणा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन पप्पू शेठ राजपूत यांनी केले आहे.
महाराणा प्रताप यांच्या शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रभक्तीच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या जयंती महोत्सवाकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले असून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजकांकडून जोरदार तयारी सुरू आहे….















