सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज): महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील महिलांसाठी जीवनदायी ठरत असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ही योजना प्रभावी माध्यम बनली आहे, असे प्रतिपादन आमदार मनोज कायंदे यांनी केले.
यावेळी बोलताना आ. कायंदे म्हणाले की, राज्य शासनाने महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी सुरू केलेली लाडकी बहीण योजना अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य मिळत असल्याने त्यांच्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्यास मोठी मदत होत आहे. तसेच महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळून त्यांचा आत्मविश्वासही वाढत आहे.
ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेत आपल्या कुटुंबाच्या आर्थिक व्यवस्थापनात सक्रिय भूमिका बजावण्यास सुरुवात केली आहे. महिलांचे सामाजिक व आर्थिक स्थान उंचावण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी सातत्याने प्रयत्न करत आहेत.
महिलांच्या सन्मान, स्वाभिमान आणि आर्थिक स्वावलंबनासाठी लाडकी बहीण योजना महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे सांगून, भविष्यातही अशा लोककल्याणकारी योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येतील, असा विश्वासही आ. कायंदे यांनी व्यक्त केला.















