जामनेर (कव्हरेज ग्रुप नेटवर्क) जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरात मुलीच्या साखरपुड्याची आणि लग्नाची तयारी जोरात सुरू असताना आईनंच आपल्या प्रियकरासोबत गुपचूप दुसरं लग्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, प्रियकराने लग्नाचे फोटो व्हॉट्सॲप स्टेटसला ठेवल्यानंतर हा सगळा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेच्या मुलीचं लग्न अवघ्या काही दिवसांवर आलं होतं. घरात लग्नाच्या तयारीची धांदल सुरू असतानाच महिला अचानक बेपत्ता झाली. सुरुवातीला नातेवाईकांनी तिचा शोध घेतला, मात्र काहीच माहिती मिळाली नाही. दरम्यान, महिलेच्या प्रियकराने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो आणि स्टेटस अपलोड केलं. ते पाहून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
हा प्रकार समोर आल्यानंतर महिलेच्या पतीने थेट जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेतली असून पुढील चौकशी सुरू केली आहे.













