मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज): सारंगपूर येथील प्रलंबित नागरी समस्यांकडे होत असलेल्या दुर्लक्षाविरोधात संतप्त झालेल्या एका ग्रामस्थाने शुक्रवारी (दि. ५ जून) पेट्रोलची बाटली हातात घेऊन थेट मेहकर पंचायत समिती गाठल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती प्रशासन आणि पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.
सारंगपूर गावात तुंबलेल्या नाल्या, साचलेले सांडपाणी आणि वाढती अस्वच्छता यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याची तक्रार आहे. गावातील रहिवासी गजानन बोरकर यांच्या घरासमोर शौचालयाचे सांडपाणी अनेक दिवसांपासून साचून राहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असून आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
या समस्येच्या निराकरणासाठी बोरकर यांनी गेल्या दोन महिन्यांपासून ग्रामपंचायत तसेच पंचायत समितीकडे वारंवार निवेदने व तक्रारी सादर केल्या होत्या. संबंधित अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करूनही प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पंचायत समितीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला आवश्यक सूचना दिल्या होत्या, मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झाला नसल्याचे बोरकर यांचे म्हणणे आहे.
प्रशासनाच्या या कथित निष्क्रियतेविरोधात संताप व्यक्त करण्यासाठी बोरकर यांनी पेट्रोलची बाटली घेऊन पंचायत समितीत प्रवेश केला आणि गटविकास अधिकाऱ्यांसमोर तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रकारामुळे पंचायत समिती परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान, सारंगपूर येथील नाल्यांची साफसफाई व सांडपाण्याच्या समस्येवर तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर बोरकर यांनी आपली आंदोलनात्मक भूमिका तात्पुरती मागे घेतली. मात्र, पुढील सात दिवसांत समस्येचे निराकरण झाले नाही, तर अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे.
या घटनेमुळे ग्रामीण भागातील मूलभूत नागरी सुविधांच्या प्रश्नाकडे प्रशासन किती गांभीर्याने पाहते, याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.














