Advertisement Advertisement

दांडगे पेट्रोल पंपाजवळील भीषण अपघातात दुसऱ्या युवकाचाही मृत्यू; चिखलीत शोककळा….

चिखली (बुलढाणा कव्हरेज न्यूज): चिखली शहरालगत बुलढाणा रोडवरील दांडगे पेट्रोल पंपाजवळ १ जून रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मोटारसायकल आणि वॅगनार कारमध्ये झालेल्या भीषण अपघातातील जखमी युवकाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने या दुर्घटनेतील मृतांचा आकडा दोनवर पोहोचला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चिखली शहरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिखली शहरातील राऊतवाडी परिसरातील रहिवासी अक्षय कुलसुंदर व गोलू गवारे हे दोघे मोटारसायकल क्रमांक एमएच-२८ बीएक्स-२७८६ वरून बुलढाण्याकडून चिखलीकडे येत होते. दरम्यान, दांडगे पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या मोटारसायकलीची वॅगनार कार क्रमांक एमएच-४९ बीबी-६३४६ सोबत समोरासमोर धडक झाली.

धडक इतकी भीषण होती की मोटारसायकलचे अनेक भाग तुटून रस्त्यावर विखुरले गेले. या अपघातात अक्षय कुलसुंदर यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी झालेल्या गोलू गवारे यांना तत्काळ उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील जे जे प्लस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र, उपचार सुरू असतानाच मंगळवारी दुपारी गोलू गवारे यांचीही प्राणज्योत मालवली. त्यामुळे या भीषण अपघातात दोन्ही युवकांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी पुढील तपास व कायदेशीर कार्यवाही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

एकाच अपघातात राऊतवाडीतील दोन युवकांचा मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!