Advertisement Advertisement

त्रिशरण चौकातील सामाजिक भवनात शिक्षकाचा अचानक मृत्यू; उष्माघात की हृदयविकाराचा झटका? तपासणी सुरू….

बुलढाणा (बुलढाणा कव्हरेज न्युज): शहरातील त्रिशरण चौक परिसरातील सामाजिक भवन येथे एका शिक्षकाचा अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेमुळे शिक्षक वर्गासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जगदेव गजानन शिंपणे (वय ५४, रा. धामणदरी गौतम नगर, बुलढाणा) असे मृत शिक्षकाचे नाव असून ते लोणार तालुक्यातील साखळी खुर्द येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंपणे हे त्रिशरण चौकातील सामाजिक भवन परिसरात असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडली. उपस्थितांनी त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून उष्माघातामुळे मृत्यू झाला की हृदयविकाराच्या झटक्याने, याबाबत जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

अचानक घडलेल्या या घटनेमुळे शिक्षक वर्गात आणि परिसरातील नागरिकांमध्ये शोककळा पसरली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या धर्मपत्नी या भोकरदन तालुक्यात परीक्षा कार्यासाठी गेल्या होत्या. अशा परिस्थितीत शिंपणे सरांच्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिंपणे सरांच्या अकाली निधनामुळे साखळी खुर्दसह बुलढाणा परिसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे वाढत्या उन्हाच्या तडाख्यात नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!