संग्रामपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील सोनाळा परिसरात एका महिलेच्या घरात घुसून तिच्यासह तिच्या मुलगा आणि मुलीला मारहाण करत अश्लील कृत्य केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सोनाळा पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनाळा येथील ४० वर्षीय महिला मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. २२ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजताच्या दरम्यान त्या आपल्या घरात असताना गावातीलच आरोपी दिलीप हा त्यांच्या घरात घुसला. कोणतेही कारण नसताना आरोपीने फिर्यादी महिला व त्यांच्या मुलीला जोराने खाली लोटून दिले.
त्यानंतर आरोपीने अश्लील कृत्य करत अत्यंत विकृत वर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, महिलेच्या लहान मुलालाही आरोपीने मारहाण करून खाली ढकलल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी पीडित महिलेने सोनाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७५ (१) व ११५ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महादेव गजानन खोने हे करीत आहेत














