मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर आज सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. लोणार तालुक्यातील शिवनी पिसा शिवाराजवळ (चॅनेल क्रमांक 296) एका ट्रॅव्हल्स बसला अचानक भीषण आग लागल्याने काही काळ परिसरात खळबळ उडाली.
प्राप्त माहितीनुसार, MH 38 F 3899 क्रमांकाची ट्रॅव्हल्स बस सायंकाळी साधारण ५.४० वाजण्याच्या सुमारास धावत असताना तिचा टायर फुटला. या घटनेनंतर काही क्षणातच बसने पेट घेतला आणि आगीने विक्राळ रूप धारण केले.
बसमध्ये अंदाजे ३० ते ३५ प्रवासी प्रवास करत होते. मात्र, प्रसंगावधान राखत चालक व कर्मचाऱ्यांनी तात्काळ सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस, महामार्ग पोलीस तसेच समृद्धी महामार्ग प्रशासनाचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बचावकार्य हाती घेत सर्व प्रवाशांना सुरक्षितस्थळी हलवले.
दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू असून या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे काम सुरू आहे.














