बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज):शहरात ११ वीमध्ये शिकणारी १६ वर्षांची अल्पवयीन पोरी घरातून निघून गेल्यानंतर बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकाने बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करून शोधमोहीम सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गजानन एकनाथ सुरोशे (वय ३६, रा. चेतना नगर, सुंदरखेड, बुलढाणा) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांची १६ वर्षांची नातेवाईक मुलगी बुलढाणा येथील एका विद्यालयात ११ वीमध्ये शिक्षण घेत आहे. ६ मार्च रोजी सकाळी सुमारे ८ वाजताच्या सुमारास ती घरातून बाहेर पडली. काही वेळानंतर तिने मोबाईलवरून फोन करून आपण पुणे येथे जात असल्याचे व दोन-तीन महिने बुलढाण्यात परत येणार नसल्याचे सांगितले.
त्यानंतर तिचा मोबाईल बंद लागल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र ती मिळून आली नाही. बेपत्ता मुलीची उंची सुमारे ५ फूट ४ इंच, रंग गोरा, केस लांब व डोळे काळे असून अंगात आकाशी रंगाचा सलवार, निळे जॅकेट आणि निळी पॅन्ट असल्याची माहिती आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिला पळवून नेले असावे असा संशय तक्रारदाराने व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संजीव जाधव करीत आहेत.













