खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) :खामगाव तालुक्यातील पिंप्री गवळी येथे घरातच गळफास घेऊन १५ वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २९ डिसेंबरच्या रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पिंप्री गवळी ता. खामगाव येथील रामदास गोपाल लोखंडे यांचे शेतातील घर असून ते कुटुंबासह तेथेच वास्तव्यास आहेत. २९ डिसेंबर रोजी रात्री रामदास लोखंडे हे कुटुंबासह घराबाहेर झोपले होते, तर त्यांची मुलगी कु. शृती नितीन लोखंडे (वय १५) ही घरात एकटी झोपली होती.
सकाळी घरातील किचनचा दरवाजा उघडून पाहिले असता कु. शृती ही घरातील टिनपत्र्याच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
याप्रकरणी रामदास लोखंडे यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, मुलीच्या मृत्यूबाबत कुणावरही संशय नसल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
खामगाव ग्रामीण पोलिसांनी कलम १९४ नुसार आकस्मित मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.













