चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज):चिखलीतील नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत नगरपरिषद अग्निशमन दलाच्या ताफ्यात एक अत्याधुनिक व सर्व सुविधा असलेले नवे वाहन दाखल झाले. या वाहनाचे लोकार्पण आज नगरपरिषद प्रांगणात आमदार सौ. श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.या प्रसंगी बोलताना आ. महाले म्हणाल्या, “अग्निशमन दल हे केवळ आगीवर नियंत्रण ठेवणारे पथक नसून प्रत्येक आपत्तीसमयी नागरिकांच्या सुरक्षेसाठी तत्पर धाव घेणारे सैनिक आहेत. रस्ते अपघात, पूरस्थिती, आगीच्या घटना वा इतर कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी हे जवान अहोरात्र जनतेची सेवा करतात. त्यांच्या या सेवेचे मोल ओळखून त्यांना सक्षम साधने व सुसज्ज वाहने मिळणे ही खरी कृतज्ञता आहे. या नव्या वाहनामुळे चिखली तालुक्यातील सुरक्षेची ताकद अधिक बळकट होणार आहे.”त्यांनी पुढे सांगितले की, “नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेसाठी प्रशासन व शासनाकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. वाढत्या चिखली शहरासाठी ही सुविधा काळाची गरज होती. त्यासाठी मी प्रयत्न केले आणि आज ते यशस्वी झाले. हे वाहन चिखलीच्या सुरक्षेच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल ठरेल.”या कार्यक्रमाला मुख्याधिकारी प्रशांत बिडगर, ठाणेदार संग्राम पाटील, ज्येष्ठ नेते सुरेशअप्पा खबूतरे, डॉ. प्रतापसिंग राजपूत, माजी नगराध्यक्ष विमलताई देव्हडे, भाजप शहराध्यक्ष सागर पुरोहित, शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव देशमुख यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिखलीत अग्निशमन दलाच्या ताफ्यात नवे वाहन दाखल;आ. श्वेता महाले पाटील यांच्या हस्ते लोकार्पण!













