पिंपळगाव सराई (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेतातून जाण्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादाने चांगलाच पेट घेतला आणि त्याचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. शिरपूर शिवारात बुधवारी घडलेल्या या घटनेत चार जणांनी मिळून एका शेतकऱ्याला लाठी-काठीने मारहाण केल्याने तो जखमी झाला. विजय मनोहर शेळके (वय ३५, रा. शिरपूर) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी रायपूर पोलिसांनी शुक्रवारी (दि. १३) चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतातून जाण्याच्या कारणावरून विजय शेळके यांचा आरोपी परमेश्वर उत्तमराव शेळके, निबाजी कुंडलीक शेळके, श्रीकृष्ण निंबाजी शेळके आणि अजिंक्य रामेश्वर शेळके (सर्व रा. शिरपूर) यांच्याशी वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. चौघांनीही विजय शेळके यांना लाठी-काठीने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
एवढ्यावरच न थांबता पुन्हा शेताजवळ आल्यास हातपाय तोडण्याची धमकीही दिल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे शिरपूर परिसरात खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी रायपूर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार निलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अनिल घाटे आणि पोलिस अंमलदार संतोष चव्हाण पुढील तपास करीत आहेत.














