जलंब (बुलडाणा कव्हरेज न्युज) : शेगाव येथून काम आटोपून दुचाकीने घराकडे परतणाऱ्या तीन तरुणांवर काळाने घाला घातला. खामगाव-नांदुरा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील पारखेड फाट्यानजीक कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना १५ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास जिओ पेट्रोल पंपासमोर घडली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर तालुक्यातील हरणखेड येथील दिगंबर चंद्रकांत इंगळे, मयूर निवास होले आणि मुक्ताईनगर तालुक्यातील घाणखेड येथील परेश सुरेश घुले हे तिघे जण दुचाकी क्रमांक एमएच २८ सीए ०३४१ ने शेगाव येथे कामानिमित्त गेले होते. काम आटोपल्यानंतर तिघेही आपल्या घरी परतण्यासाठी निघाले होते.
दरम्यान, खामगाव-नांदुरा महामार्गावरील पारखेड फाट्यानजीक असलेल्या जिओ पेट्रोल पंपासमोर त्यांच्या दुचाकीला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिली. धडक इतकी जबर होती की, या अपघातात दुचाकीवरील तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला. काही क्षणांतच आनंदाने घरी परतणाऱ्या तिघांच्या प्रवासाचा दुर्दैवी शेवट झाला.
घटनेची माहिती मिळताच जलंब पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील तिन्ही तरुणांना खामगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिघांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. वृत्त लिहिपर्यंत जलंब पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू होती. या दुर्दैवी घटनेमुळे मृत तरुणांच्या गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.














