किनगावराजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : हॉटेलमध्ये जेवणासाठी थांबणं एका दुचाकीस्वाराला चांगलंच महागात पडलं. जेवण आटोपून बाहेर आले तर उभी केलेली दुचाकीच गायब! सिंदखेडराजा-मेहकर मार्गावरील पिंपळगाव लेंडी फाट्याजवळ असलेल्या ‘आमदार’ हॉटेलसमोरून २५ हजार रुपये किमतीची होंडा सीबी शाईन दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना १२ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. याप्रकरणी तब्बल महिनाभरानंतर ११ नोव्हेंबर रोजी किनगावराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत राहुल गजानन जाधव (वय ३०, रा. किनगावराजा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली. राहुल जाधव हे बुलढाणा येथील एचडीएफसी बँकेत नोकरीला असून, १२ ऑक्टोबर रोजी रात्री ते रवि पालवे यांच्यासोबत बुलढाण्याहून किनगावराजाकडे येत होते. रात्री नऊच्या सुमारास जेवणासाठी दोघेही पिंपळगाव लेंडी फाट्याजवळील आमदार हॉटेलमध्ये थांबले. राहुल यांनी काळ्या रंगाची होंडा सीबी शाईन (एमएच २८ बीडी ३४३७) हॉटेलसमोर उभी केली होती.
दोघांनी जेवण आटोपले अन् बाहेर आले, तर दुचाकी लावलेल्या जागेवर दिसेना. सुरुवातीला आजूबाजूला शोधाशोध केली, मात्र गाडीचा कुठेच पत्ता लागला नाही. अखेर आपली २५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा अहवाल राहुल जाधव यांनी पोलिसांत दिला.
विशेष म्हणजे, ही दुचाकी राहुल यांचे भाऊ रामेश्वर गजानन जाधव यांनी २०१८ मध्ये खरेदी केली होती. तेव्हापासून राहुलच या गाडीचा वापर करीत होते. या प्रकरणी किनगावराजा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदारांच्या आदेशानुसार पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल नागरे करीत आहेत.













