Advertisement Advertisement

मंडपगावच्या शिवारात मध्यरात्री प्रशासनाची धडक!रेतीच्या धंद्याला मोठा दणका, एक-दोन नाय तर तब्बल ९ टिप्पर पकडले! १६ तासांच्या मोहिमेनं रेतीवाल्यांची झोपच उडवली!

देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीचा धंदा सुरू असल्याच्या तक्रारींना आता महसूल व पोलीस प्रशासनाने जोरदार दणका दिला आहे. २ नोव्हेंबरच्या मध्यरात्री जुने मंडपगाव शिवारात अचानक धाड टाकत अवैध रेती वाहतुकीच्या तयारीत असलेले तब्बल नऊ टिप्पर जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे रेतीच्या अवैध व्यवसायात गुंतलेल्यांचे धाबे दणाणले असून, सर्व टिप्पर पुढील कायदेशीर कारवाईसाठी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले आहेत.

सलग १६ तास सुरू होती धडक मोहीम!

२ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता सुरू झालेली ही कारवाई ३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत सुरू होती. तब्बल १६ तास महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाने ही मोहीम राबविली. परिविक्षाधीन तहसीलदार प्रमोद खमाट यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथकाने पोलिसांच्या मदतीने जुने मंडपगाव शिवारात अचानक छापा टाकला. यावेळी अवैध रेती वाहतुकीच्या तयारीत असलेले नऊ टिप्पर पथकाच्या हाती लागले.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाची कारवाई….

तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी आणि पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर यांनी कारवाईत सहकार्य केले. या मोहिमेत मंडळ अधिकारी पी. टी. जायभाये, विजय हिरवे, तलाठी सुमित जाधव, संजय हांडे, शिपाई पंजाबराव ताठे, महसूल सेवक रामेश्वर शेरे आणि चालक म्हस्के यांचा सहभाग होता.

कारवाई झाली, आता सातत्य राखण्याची गरज!

तालुक्यात अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाने केलेली नऊ टिप्परवरील कारवाई महत्त्वाची मानली जात आहे. मात्र, केवळ एखादी धडक कारवाई करून चालणार नाही, तर अवैध रेतीचा धंदा करणाऱ्यांवर सातत्याने नजर ठेवून अशा मोहिमा सुरू ठेवण्याची गरज आहे. प्रशासनाच्या या कारवाईनंतर आता रेती तस्करीला कायमचा आळा बसणार का, याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!