सुलतानपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज) : नेहमीच वाहनांची आणि नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या सुलतानपूर शहरात भरदिवसा चोरीची धक्कादायक घटना घडली. वाहतूक कोंडीचा फायदा उठवत अज्ञात चोरट्याने मंडळ अधिकाऱ्यांच्या वाहनातून रोख ५० हजार रुपये, शासकीय लॅपटॉप आणि महत्त्वाची प्रशासकीय कागदपत्रे असलेली बॅग लंपास केली. या प्रकारामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंडळ अधिकारी लक्ष्मण नारायण सानप यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम असल्याने ते मेहकर येथून स्वतःच्या वाहनाने लोणारकडे जात होते. दरम्यान, आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास त्यांचे वाहन सुलतानपूर शहरात पोहोचले. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने त्यांची गाडी गर्दीत अडकली होती. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने वाहनातील बॅग चोरून नेली.
या बॅगेमध्ये ५० हजार रुपयांची रोख रक्कम, कार्यालयाचा लॅपटॉप तसेच महत्त्वाच्या शासकीय फाईल्स आणि कागदपत्रे होती. वाहतूक कोंडी कमी झाल्यानंतर काही वेळाने गाडीत बॅग नसल्याचे सानप यांच्या लक्षात आले. भरवस्तीत आणि भरदिवसा घडलेल्या या चोरीच्या प्रकाराने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
घटनेची माहिती मिळताच सुलतानपूर बीटचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल शिवानंद केदार आणि एपीआय अवचार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे.
शासकीय कागदपत्रे आणि लॅपटॉपही चोरीला गेल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. आता सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्याचा माग काढण्यात पोलिसांना कितपत यश येते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
टीप : ही बातमी उपलब्ध प्राथमिक माहितीनुसार तयार करण्यात आली असून, अधिकृत पोलीस माहिती प्राप्त झाल्यानंतर तपशिलात बदल होऊ शकतो.













