साखरखेर्डा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सुखी संसार सुरू असतानाच इन्स्टाग्रामवरून एका युवकासोबत जुळलेले प्रेमसंबंध एका कुटुंबासाठी वादाचे कारण ठरले. तब्बल १२ वर्षांचा संसार, दोन मुले आणि नातेवाईकांची समजूत यापैकी कशाचाही विचार न करता दोन मुलांच्या आईने पतीसोबत राहण्यास नकार दिला. अखेर संबंधित युवकासोबत जाण्याचा निर्णय तिने घेतल्याची घटना २ नोव्हेंबर रोजी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात हद्दीत घडली आहे. या प्रकाराची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिलेच्या पतीने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी एका गावातून महिलेला ताब्यात घेतले. तिच्यासोबत इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रेमसंबंध जुळलेला ३० वर्षीय युवक यालाही पोलीस ठाण्यात आणण्यात आले. यावेळी महिलेचा पती, काका, चुलत भाऊ आणि अन्य नातेवाईक उपस्थित होते. सर्वांनी मिळून तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही बराच वेळ तिला समजावून सांगितले; मात्र महिलेने आपला निर्णय बदलण्यास स्पष्ट नकार दिला.
‘मला पतीसोबत राहायचे नाही!’
‘माझे खरे प्रेम याच्यासोबत आहे. मी त्याच्याशिवाय राहू शकत नाही. मला पतीसोबत राहायचे नाही,’ अशी ठाम भूमिका महिलेने पोलिसांसमोर मांडल्याची माहिती आहे. संबंधित महिलेचे लग्न होऊन १२ वर्षे झाली असून तिला दोन मुले आहेत. मोठा मुलगा दहा वर्षांचा, तर दुसरा मुलगा चार ते पाच वर्षांचा आहे. लांबच्या नात्यातील ३० वर्षीय युवकासोबत तिची इन्स्टाग्रामवर ओळख झाली आणि पुढे त्याचे प्रेमसंबंधात रूपांतर झाल्याचे समोर आले.
चार वर्षांच्या मुलाला घेऊन युवकासोबत जाण्याचा निर्णय!
विशेष म्हणजे, महिलेने चार वर्षांच्या मुलाला सोबत घेऊन संबंधित युवकासोबत जाण्याचा निर्णय घेतला. नातेवाईकांनी १२ वर्षांचा संसार आणि दोन मुलांच्या भविष्याचा विचार करण्याची विनंती केली. मात्र, तिच्या निर्णयावर त्याचा कोणताही परिणाम झाला नाही. हे प्रकरण मेहकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने साखरखेर्डा पोलिसांनी महिलेला पुढील कार्यवाहीसाठी मेहकर पोलिसांच्या ताब्यात दिले. मेहकरला जातानाही संबंधित युवकाच्याच वाहनातून जाण्याचा आग्रह तिने धरल्याची माहिती आहे.
या घटनेमुळे सोशल मीडियावरील ओळखी, प्रेमसंबंध आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कौटुंबिक वादांचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर करताना विवेक बाळगण्याची गरज असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात मुलांच्या संगोपनाचा आणि त्यांच्या भविष्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.













