Advertisement Advertisement

ऑटोत बसली अन् माळेगावजवळ उतरली! आई-बाप शोधून शोधून हैराण! शाळेत गेलेली अल्पवयीन पोरगी बेपत्ता….

पिंप्री गवळी (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मोताळा तालुक्यातील आव्हा येथे अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. गावातीलच एका २५ वर्षीय तरुणाने फूस लावून मुलीला पळवून नेल्याचा संशय तिच्या आईने व्यक्त केला असून, याप्रकरणी ३१ ऑक्टोबर रोजी धामणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी १७ वर्षे ४ महिने २७ दिवस वयाची असून, ती नेहमीप्रमाणे शाळेत गेली होती. मात्र, बराच वेळ होऊनही ती घरी परतली नाही. त्यामुळे चिंतेत पडलेल्या आईने गावातील एका ओळखीच्या ऑटोचालकाकडे मुलीची विचारपूस केली. त्यावेळी ऑटोचालकाने मुलगी गावातील सहदेव चांगदेव घोंगटे (वय २५) याच्यासोबत बोलताना दिसल्याचे सांगितले.

त्यानंतर मुलगी ऑटोने घरी जाण्यासाठी निघाली होती. मात्र, माळेगावजवळ महत्त्वाचे काम असल्याचे सांगून ती ऑटोतून उतरल्याची माहिती चालकाने दिली. यानंतर मुलीचे आई-वडील आणि गावच्या सरपंचांनी कॉलेजमध्ये जाऊन शोध घेतला; मात्र मुलगी कुठेही आढळून आली नाही.

अखेर मुलीच्या आईने सहदेव चांगदेव घोंगटे यानेच आपल्या मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत धामणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून संबंधित तरुणाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक निखिल निर्मळ यांच्या आदेशानुसार तपास अधिकारी पोहेकॉ संजय जवरे करीत आहेत. मुलगी बेपत्ता झाल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!