नांदेड (बुलडाणा कव्हरेज न्युज) : “दुष्काळात शेतकऱ्यांच्या दारात जाऊन जबरदस्ती वसुली कराल, महिलांना त्रास द्याल, तर एकही फायनान्स कंपनीचे कार्यालय शिल्लक ठेवणार नाही,” असा आक्रमक इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला होता. आता या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव व कार्यकर्त्यांनी दोन खासगी फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांची तोडफोड केल्याची माहिती समोर आली आहे. श्रीराम फायनान्स आणि बजाज फायनान्स या कंपन्यांच्या कार्यालयांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे नांदेडमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
राज्यात दुष्काळाने शेतकरी, शेतमजूर आणि भूमिहीन कुटुंबांचे जगणे कठीण झाले असताना मायक्रोफायनान्स आणि खासगी फायनान्स कंपन्यांकडून सक्तीची वसुली सुरू असल्याचा गंभीर आरोप रविकांत तुपकर यांनी यापूर्वी केला होता. “वसुलीवाल्यांनो, शेतकऱ्यांच्या दारात याल, महिलांना त्रास द्याल, तर कपडे काढून फटके देऊ! सरकारने वेळीच आवरावे, अन्यथा जोरजबरदस्तीने वसुली करणाऱ्या कंपन्यांचे एकही कार्यालय शिल्लक ठेवणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला होता.
दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूनंतर तुपकरांनी घेतली होती आक्रमक भूमिका!
नांदेड येथील चंद्रकांत शिंदे आणि लातूर येथील दत्तात्रय कुंभार या दोन शेतकऱ्यांच्या मृत्यूमागे मायक्रोफायनान्स कंपन्यांच्या सक्तीच्या वसुलीचा दबाव असल्याचा आरोप करण्यात आला होता. या दोन्ही शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची रविकांत तुपकर यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन सांत्वन केले होते. या घटनांच्या पार्श्वभूमीवर तुपकरांनी मायक्रोफायनान्स कंपन्या, खासगी फायनान्स कंपन्या आणि पतसंस्थांच्या वसुली पद्धतींविरोधात आक्रमक भूमिका जाहीर केली होती.
दरम्यान, आज,२ नोव्हेंबरला नांदेडमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दोन फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांची तोडफोड केल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे क्रांतिकारी शेतकरी संघटना व मायक्रो फायनान्स कंपन्या समोरासमोर येणार आणि राज्यात आंदोलन पेटणार असल्याचा इशारा नेत्यांनी दिला आहे.तुपकरांनी यापूर्वी दिलेल्या इशाऱ्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.














