बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज): अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला धमकावत वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आरोपीला बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालय तथा विशेष पोक्सो न्यायालयाने २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश रविकुमार केशरमल शर्मा यांनी शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. आरोपी सतिष शंकर खंडारे (वय ३२, रा. देऊळघाट, ता. बुलढाणा) याला २० वर्षे कारावासासह दंडही ठोठावण्यात आला आहे.
प्रकरणातील माहितीनुसार, ३ एप्रिल २०२१ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास आरोपीने एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे तपासात समोर आले. या प्रकारानंतर पीडिता गर्भवती राहिल्याने संपूर्ण घटना उघडकीस आली. याप्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन तपासाधिकारी पोलीस उपनिरीक्षक गजानन शिंदे यांनी केला. तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील संतोष मुलचंद खत्री यांनी बाजू मांडली. त्यांनी एकूण १० साक्षीदार तपासले. यामध्ये पीडिता आणि तिच्या आईची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि न्यायालयासमोर सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.
विशेष न्यायाधीश रविकुमार शर्मा यांनी पोक्सो कायद्याच्या कलम ६ अन्वये आरोपीला २० वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड, तर भादंवि कलम ५०६ अन्वये १ वर्ष सश्रम कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या सर्व शिक्षा एकत्रित भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच दंडाची संपूर्ण रक्कम पीडितेला नुकसानभरपाई म्हणून देण्याचेही आदेशात नमूद केले आहे.
या खटल्यात कोर्ट पैरवी म्हणून सहाय्यक फौजदार शेखर थोरात यांनी सहकार्य केले. चार वर्षांपूर्वी घडलेल्या या प्रकरणाचा न्यायालयीन निकाल लागल्याने पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.












