Advertisement Advertisement

तुरीतलं तण मारायला गेला, पण फवारणीच काळ बनून आली! २७ वर्षांच्या अमरसिंगचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू…

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): स्वतःच्या शेतातील तुरीच्या पिकात वाढलेले तण काढण्यासाठी तणनाशकाची फवारणी करणे एका शेतकरी पुत्राच्या जीवावर बेतले. फवारणीदरम्यान विषबाधा झाल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या २७ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. अमरसिंग केसरसिंग बोराडे असे मृत तरुणाचे नाव असून, २८ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास अकोला येथे उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे पोरज गावावर शोककळा पसरली आहे.

पोरज (ता. खामगाव) येथील अमरसिंग बोराडे हा २३ ऑक्टोबर रोजी सकाळी आपल्या शेतातील तुरीच्या पिकात तणनाशक फवारणी करण्यासाठी गेला होता. फवारणी सुरू असतानाच त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे तो दुपारच्या सुमारास घरी परतला. घरी आल्यानंतर त्याला उलट्याही झाल्या. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी वेळ न दवडता त्याला खामगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मात्र, अमरसिंगची प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्याला अकोला येथे दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी त्याची प्रकृती आणखी खालावली. डॉक्टरांनी त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; परंतु उपचारांना यश आले नाही.

अखेर २८ ऑक्टोबर रोजी रात्री ११.३० वाजताच्या सुमारास अमरसिंगचा मृत्यू झाला. २९ ऑक्टोबर रोजी पोरज येथे त्याच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. तरुण वयातच शेतकरी कुटुंबातील मुलाचा असा दुर्दैवी अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. मृत अमरसिंगच्या कुटुंबीयांनी या घटनेची माहिती दिली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!