चॉकलेटचं आमिष दाखवून चिमुरडीला दुकानात बोलावलं! ८ वर्षांच्या लेकरासोबत संतापजनक कृत्य केल्याचा आरोप! जीवे मारण्याची धमकी; ६० वर्षीय आरोपी गजाआड!
बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : लहान मुलांना चॉकलेटचे आमिष दाखवून त्यांचा गैरफायदा घेतल्याच्या गंभीर घटना समोर येत असताना बुलढाणा शहरातही असाच संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. अवघ्या आठ वर्षांच्या चिमुरडीला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून दुकानात बोलावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप ६० वर्षीय टपरीचालकावर करण्यात आला आहे. तसेच, घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.
चॉकलेटचे आमिष दाखवून दुकानात बोलावल्याचा आरोप!
पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास आठ वर्षीय बालिका कुत्र्याला आणण्यासाठी आरोपीच्या टपरीजवळ गेली होती. यावेळी शेख मोहम्मद पीर मोहम्मद (वय ६०, रा. बुलढाणा) याने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून बालिकेला दुकानात बोलावल्याचा आरोप आहे. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. लहान मुलांच्या निरागसतेचा गैरफायदा घेतल्याचा हा प्रकार समोर आल्याने बालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
तोंड उघडल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद!
कथित अत्याचारानंतर बालिकेला हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यानंतर बालिकेला तेथून हाकलून दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे. घरी परतल्यानंतर बालिकेने आपल्या पालकांना घडलेला प्रकार सांगितला. मुलीने सांगितलेली हकीकत ऐकून कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी तातडीने बुलढाणा शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
पोलिसांत गुन्हा दाखल; आरोपीला अटक….
बालिकेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे बुलढाणा शहर पोलिसांनी २४ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. या प्रकरणी शेख मोहम्मद पीर मोहम्मद याला अटक करण्यात आली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा अर्थात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करीत आहेत.
पालकांनो, मुलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष द्या!
या घटनेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. चॉकलेट, खेळणी किंवा इतर वस्तूंचे आमिष दाखवून अनोळखी व्यक्ती मुलांना जवळ बोलावण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे मुलांना अनोळखी व्यक्तींसोबत कुठेही न जाणे, कोणी अयोग्य वर्तन केल्यास किंवा धमकावल्यास विश्वासातील मोठ्या व्यक्तीला तातडीने सांगणे, याबाबत वयानुसार समजावून सांगणे महत्त्वाचे आहे.
आठ वर्षांच्या चिमुरडीने घरी परतल्यानंतर पालकांना माहिती दिल्यामुळे हा प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचला. बालिकेला आवश्यक संरक्षण आणि समुपदेशन मिळणे, प्रकरणाचा संवेदनशीलतेने तपास होणे आणि न्यायप्रक्रियेद्वारे सत्य समोर येणे महत्त्वाचे आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी कुटुंबीयांसह संपूर्ण समाजाने सतर्क राहण्याची गरज या घटनेने अधोरेखित केली आहे.













