मेरा बु. (बुलडाणा कव्हरेज न्युज) : सततची नापिकी, त्यात दुष्काळाचे संकट आणि डोक्यावर वाढत चाललेला कर्जाचा भार, अशा परिस्थितीमुळे अंत्री खेडेकर येथील २५ वर्षीय शेतकरी पुत्र सचिन ज्ञानेश्वर भिनये याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मेरा बु. येथील शेतशिवारात मंगळवार, २१ ऑक्टोबर रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे अंत्री खेडेकर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अंढेरा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंत्री खेडेकर येथील रहिवासी सुनीता ज्ञानेश्वर भिनये यांच्या नावे मेरा बु. शेतशिवारातील गट क्रमांक ११०९ मध्ये दीड एकर कोरडवाहू जमीन आहे. या जमिनीवर सोयाबीनची लागवड करण्यासाठी त्यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या मेरा खुर्द शाखेतून ५० हजार रुपयांचे पीककर्ज घेतले होते. मात्र, पावसाअभावी निर्माण झालेल्या कोरड्या दुष्काळामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आणि शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळण्याची आशाही मावळली.
शेतीतील नुकसान आणि कर्जाची परतफेड कशी करायची, या विवंचनेत कुटुंब सापडले होते. आई-वडिलांना कर्ज फेडता येणार नाही, या चिंतेतून सचिन २१ ऑक्टोबर रोजी सकाळी घरातून शेताकडे गेला. तेथे त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. सततची नापिकी आणि दुष्काळामुळे शेतकरी कुटुंबांवर ओढवणाऱ्या आर्थिक संकटाचे विदारक वास्तव या घटनेतून पुन्हा समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच गावचे पोलीस पाटील रामदास मोरे, माजी सरपंच बाळू पाटील, नाना खेडेकर यांच्यासह सचिनचे आई-वडील व नातेवाईक घटनास्थळी पोहोचले. या घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, अंढेरा पोलीस ठाण्याचे ठाणेदार रुपेश शक्करगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचांसमक्ष पंचनामा केला. या प्रकरणाची भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली असून, पुढील कार्यवाही अंढेरा पोलीस करीत आहेत.












