रायपूर (बुलडाणा कव्हरेज न्युज : राधेश्याम काळे) : रायपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सैलानी बाबा दर्गा परिसरात अंदाजे ६५ वर्षे वयाच्या एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, मृत महिलेची ओळख पटविण्यासाठी रायपूर पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.
मृत महिलेच्या जवळ ‘लिलावती मुंडे’ हे नाव नमूद असलेली दवाखान्याची चिठ्ठी तसेच एक फोटो आढळून आला आहे. या चिठ्ठीच्या आधारे महिलेची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, अद्याप तिची ओळख स्पष्ट झालेली नाही. याप्रकरणी रायपूर पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
आपल्या गावातील किंवा परिचयातील ही महिला आहे का? याबाबत नागरिकांनी माहिती घेऊन पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. मृत महिला कोणाच्या परिचयातील असल्यास किंवा तिच्या नातेवाईकांबाबत काही माहिती असल्यास तातडीने रायपूर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा. तसेच, महिलेची ओळख पटविण्यासाठी ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
या प्रकरणाचा तपास ठाणेदार निलेश सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास खारडे आणि पोलीस कर्मचारी अझरुद्दीन काझी करीत आहेत.
संपर्कासाठी :
– रायपूर पोलीस स्टेशन : ०७२६२-२७००३०
– पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास खारडे : ८४२१६१३३८२
– पोलीस कर्मचारी अझरुद्दीन काझी : ९३७०९६१९६२
महिलेची ओळख पटविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन रायपूर पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.












