खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : ‘आम्ही इंटेलिजन्स ब्युरोचे (IB) अधिकारी आहोत, तुमच्या भावावर मनी लॉन्ड्रिंगची कारवाई होणार आहे,’ अशी भीती दाखवून तब्बल १० लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार खामगावात उघडकीस आला आहे. सरकारी तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याची बतावणी करत बनावट ओळखपत्र आणि खोटी नोटीस पाठवून फसवणुकीचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी चितोडा येथील गोपाल प्रल्हाद पोटे (वय ३०) याला अटक केली आहे.
खामगाव शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील केला नगर येथील रहिवासी मोहन शामराव अरबट (वय ६१) यांनी ९ ऑक्टोबर रोजी खामगाव शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, २९ सप्टेंबर रोजी रात्री ८.२१ वाजेपासून ते ८ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेपर्यंतच्या कालावधीत आरोपी गोपाल प्रल्हाद पोटे (रा. चितोडा, अंबिकापूर) आणि एका मोबाईल क्रमांकाच्या धारकाने संगनमत करून फसवणुकीचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.
आरोपींनी अरबट यांच्या भावाशी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे संपर्क साधला. यावेळी आपण इंटेलिजन्स ब्युरोचे अधिकारी असल्याचे भासवून बनावट ओळखपत्र दाखविण्यात आले. एवढेच नव्हे, तर संबंधित मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअॅपद्वारे खोटी नोटीसही पाठविण्यात आली. तुमच्या भावाविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगची कारवाई होणार असल्याचे सांगून भीती निर्माण करण्यात आली आणि या कारवाईतून वाचविण्याच्या नावाखाली १० लाख रुपये उकळण्याचा प्रयत्न झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तक्रार दाखल होताच पोलिसांची कारवाई!
या प्रकाराची तक्रार प्राप्त झाल्यानंतर खामगाव शहर पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. मोहन अरबट यांच्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासादरम्यान गोपाल प्रल्हाद पोटे याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर बर्वे करीत आहेत. या प्रकारात अन्य कोणाचा सहभाग आहे का, याबाबत तपासातून माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
नागरिकांनो, बनावट नोटिसांपासून सावध राहा!
सरकारी तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना घाबरवणे आणि पैशांची मागणी करणे, हा गंभीर प्रकार आहे. अनोळखी व्यक्तींकडून व्हॉट्सअॅपवर आलेले ओळखपत्र, नोटीस किंवा कारवाईचे संदेश पाहून घाबरून जाऊ नये. संबंधित व्यक्तीची ओळख आणि नोटिशीची सत्यता अधिकृत यंत्रणेकडून तपासून घ्यावी. अशा प्रकारे पैशांची मागणी झाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन या घटनेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे ठरते.













