Advertisement Advertisement

मोठी बातमी!सोमठाण्याच्या तिहेरी हत्याकांडानं जिल्हा हादरला!आई, सख्खा भाऊ अन् पुतण्याच्या हत्येचा आरोप असलेला दीपक पनवेलमध्ये धरला!तिघांना संपवल्यानंतरही सूडाची आग शांत झाली नाय?पुतणी अन् भावाच्या बायकोपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक चर्चा!दीपक पोलिसांच्या जाळ्यात; आता चौकशीतून कोणकोणते गौप्यस्फोट होणार?

बुलडाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या सोमठाणा येथील तिहेरी हत्याकांडात मोठी घडामोड समोर आली आहे. जन्मदात्या आईसह सख्खा भाऊ आणि पुतण्याच्या हत्येचा आरोप असलेला मुख्य संशयित दीपक फत्तेसिंग सुरडकर याने पनवेल येथे पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. शुक्रवारी, ९ ऑक्टोबरच्या रात्री उशिरा त्याने पनवेल पोलिस ठाण्यात शरणागती पत्करल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच चिखली पोलिसांचे पथक पनवेलच्या दिशेने रवाना झाले. १० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास वृत्त लिहिताना दीपकला पनवेल न्यायालयात हजर करण्यात आल्याची माहिती होती. त्याला चिखलीत आणण्याची प्रक्रिया सुरू असून, या प्रकरणाच्या तपासाला आता वेग येण्याची शक्यता आहे.

तिहेरी हत्याकांडानंतरही सूडाचे सत्र सुरूच असल्याची चर्चा!

८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सोमठाणा येथे घडलेल्या या घटनेत सरस्वतीबाई फत्तेसिंग सुरडकर, संजय फत्तेसिंग सुरडकर आणि रणजीत संजय सुरडकर यांचा मृत्यू झाला होता. या तिहेरी हत्याकांडानंतर दीपक घटनास्थळावरून पसार झाला होता. दरम्यान, या घटनेनंतरही त्याचा राग शांत झाला नव्हता आणि त्याने संजयच्या कुटुंबातील अन्य सदस्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. संजयची मुलगी वैष्णवी हिच्या दिवठाणा येथील घराकडे दीपक गेल्याचे सांगितले जात आहे. मात्र, घर बंद असल्याने त्याला तिथे जाता आले नसल्याची माहिती आहे. त्यानंतर तो संजयच्या पत्नीपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने शेलुद येथे गेल्याचीही चर्चा आहे. मात्र, या संपूर्ण घटनाक्रमाला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

जमिनीचा हिस्सा, पेन्शन अन् मोटारीच्या वायरवरून वाद?

प्राथमिक माहितीनुसार, आईच्या नावावरील जमिनीचा हिस्सा आणि पेन्शनवरून दीपक व संजय यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. याच कारणावरून दोघांमध्ये कुरबुरी होत असल्याचे सांगितले जाते. घटनेच्या दिवशी शेतातील मोटारीच्या वायरवरून दोघांमध्ये वाद झाला होता. गावकऱ्यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटविल्याची माहिती आहे. मात्र, त्यानंतर काही तासांतच तीन जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. कौटुंबिक वादातूनच हे हत्याकांड घडले का, तसेच या घटनेमागील नेमके कारण काय, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.

मुलगा जगदीशही पोलिसांच्या ताब्यात; तपासाकडे लक्ष…..

या प्रकरणात दीपकचा २० वर्षीय मुलगा जगदीश सुरडकर यालाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती यापूर्वी समोर आली होती. हत्याकांडानंतर तो फरार झाल्याचे सांगण्यात आले होते. त्याला सवणा गावातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. आता मुख्य संशयित दीपकने पनवेल येथे आत्मसमर्पण केल्याने या प्रकरणातील अनेक महत्त्वाच्या बाबींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. हत्याकांडानंतर दीपक कुठे गेला, पनवेलपर्यंत कसा पोहोचला, त्याला कोणी मदत केली आणि त्याने आत्मसमर्पण करण्याचा निर्णय का घेतला, या प्रश्नांची उत्तरे तपासातून समोर येतील. तसेच त्याच्या मुलाची या प्रकरणातील नेमकी भूमिका काय, हेही पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. दीपकला चिखलीत आणल्यानंतर चौकशीतून या थरारक प्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!