Advertisement Advertisement

EXCLUSIVE:राजकारणाला रामराम ठोकणार का शिंगणे?‘आता माझी वेळ झाली… नव्या पोरांना पुढं येऊ द्या!’ म्हणत दिले निवृत्तीचे संकेत….

EXCLUSIVE:राजकारणाला रामराम ठोकणार का शिंगणे?‘आता माझी वेळ झाली… नव्या पोरांना पुढं येऊ द्या!’ म्हणत दिले निवृत्तीचे संकेत….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): जिल्ह्याच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री तथा बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. चिखली अर्बन बँकेच्या ६५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना त्यांनी आगामी काळात राजकारणापेक्षा सहकार क्षेत्रात पूर्णवेळ काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे सिंदखेड राजा मतदारसंघासह जिल्ह्याच्या राजकारणात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.

‘एका टप्प्यावर राजकारणात थांबले पाहिजे’; तरुण पिढीला संधी देण्याचा शिंगणेंचा सूर….

सभेत बोलताना डॉ. शिंगणे यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय प्रवासाचा संदर्भ देत वयाच्या एका टप्प्यावर राजकारणात थांबण्याची गरज असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आपले वय आता ६५ वर्षे झाले असून आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांपर्यंत वय ६८ वर्षांच्या आसपास जाईल. आजचा काळ ‘जेन-झी’ आणि नव्या तरुण पिढीचा असून त्यांची विचारसरणीही वेगळी आहे. त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

डॉ. शिंगणे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेताना सुमारे २५ वर्षे आमदार, साडेचार वर्षे कॅबिनेट मंत्री आणि आठ वर्षे राज्यमंत्री म्हणून विविध जबाबदाऱ्या पार पाडल्याचे नमूद केले. त्यामुळे आता पुढील पिढीला संधी देण्याचा विचार करणे आवश्यक असल्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यातून मिळाले.

राजकारणापासून अंतर, मात्र सहकार क्षेत्रात काम सुरूच….

सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याचा विचार व्यक्त केला असला तरी सहकार क्षेत्राशी असलेले आपले नाते कायम राहणार असल्याचे डॉ. शिंगणे यांनी स्पष्ट केले. राजकारणात प्रत्यक्ष सक्रिय नसलो तरी सहकाराच्या माध्यमातून जनतेशी जोडलेले राहणार, लोकांना मदत करणार आणि पुढील पिढीला मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच विदर्भ मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून शेतकरी, बँकेचे सभासद आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेशी संबंधित प्रश्नांवर काम सुरूच ठेवण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

एकाच दिवशी दोन बँकांच्या व्यासपीठावर हजेरी; राजकीय चर्चांना उधाण….

दरम्यान, एकाच दिवशी चिखली शहरातील दोन प्रमुख सहकारी बँकांच्या वार्षिक सभांमध्ये डॉ. शिंगणे यांनी उपस्थिती लावल्याची बाबही राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरली आहे. चिखली अर्बन बँकेच्या सभेत त्यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्यांच्या या वक्तव्यामागे आगामी राजकीय घडामोडींचा काही संदर्भ आहे का, याबाबत मात्र अद्याप त्यांनी कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत.

सरकारचे कौतुक अन् शिंगणेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात संभ्रम….

विशेष म्हणजे, याच कार्यक्रमात डॉ. शिंगणे यांनी राज्यातील महायुती सरकारच्या दुष्काळासंदर्भातील निर्णयाचे कौतुक केले. पूर्वी दुष्काळ जाहीर करण्यासाठी पंचनामे आणि विविध प्रक्रिया पूर्ण कराव्या लागत होत्या; मात्र सध्याच्या सरकारने पंचनाम्याची वाट न पाहता तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर केल्याचे त्यांनी नमूद केले आणि सरकारचे अभिनंदन केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाशी संबंधित असलेल्या डॉ. शिंगणे यांनी सरकारच्या निर्णयाचे केलेले कौतुक आणि त्याचवेळी ‘राजकारणात कुठेतरी थांबले पाहिजे’ असे व्यक्त केलेले मत यामुळे त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेबाबत चर्चेला अधिकच उधाण आले आहे. मात्र, सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा अंतिम निर्णय त्यांनी जाहीर केलेला नसून, त्यांच्या वक्तव्यातून त्याचे संकेत मिळाले आहेत, एवढेच सध्या स्पष्टपणे म्हणता येईल.

त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असून, आगामी काळात डॉ. शिंगणे यांच्या भूमिकेचा सिंदखेड राजा मतदारसंघ आणि बुलढाणा जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होतो, याकडे राजकीय कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!