Advertisement Advertisement

पैनगंगेच्या पाण्यामुळे उत्रदा येथील शेतीपिकांचे नुकसान टाळण्यासाठी छोटा पूल; शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश! विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन; नायब तहसीलदार गायकवाड यांच्या यशस्वी मध्यस्थीने तोडगा, उद्यापासून पुलाच्या कामास सुरुवात….

चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): उत्रदा गावाजवळ पैनगंगा नदीच्या मोठ्या पुलाच्या बाजूला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने अजयदीप इन्फ्राकॉन प्रा. लि. कंपनीमार्फत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती. नैसर्गिक पाण्याच्या निचऱ्याच्या ठिकाणी छोटा पूल बांधण्यात येत नसल्याने पैनगंगा नदीला पूर आल्यानंतर पाणी शेतांमध्ये तुंबण्याची भीती व्यक्त करत शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली.
रस्त्याची उंची वाढविण्यात येत असल्याने नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडल्यास शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. त्यामुळे “आधी पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था करा, नंतरच रस्त्याचे काम करा,” अशी ठाम भूमिका घेत शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले.
पैनगंगा नदीला पूर आल्यानंतर दरवर्षी या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान होते. त्यामुळे भविष्यातील संभाव्य नुकसान टाळण्यासाठी संबंधित ठिकाणी तातडीने छोटा पूल बांधून पाण्याच्या विसर्गाची योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
या प्रश्नाबाबत वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने शेतकऱ्यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांना माहिती दिली. माहिती मिळताच दोघांनी तातडीने आंदोलनस्थळी धाव घेत शेतकऱ्यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला.
घटनास्थळावरूनच संबंधित विभागाचे अधिकारी तसेच तहसीलदार सवडे व नायब तहसीलदार गायकवाड यांच्याशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती देण्यात आली. यावेळी “आज रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर छोट्या पुलाचे बांधकाम कोण करणार? भविष्यात शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाल्यास त्याला जबाबदार कोण?” असा थेट सवाल विनायक सरनाईक यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केला. रस्त्याचे काम पूर्ण करण्यापूर्वीच पाण्याच्या विसर्गाची योग्य व्यवस्था करण्याची मागणीही त्यांनी केली.
अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
शेतकरी तसेच विनायक सरनाईक व नितीन राजपूत यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर नायब तहसीलदार गायकवाड व संबंधित विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत परिस्थितीची पाहणी केली.
चर्चेनंतर भविष्यात नदीच्या पाण्यामुळे शेतीपिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी संबंधित ठिकाणी तीन लाईन बंब टाकून छोटा पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रस्तावित कामाचे मोजमाप तहसीलदार, संबंधित अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत चुना टाकून करण्यात आले.
नायब तहसीलदार गायकवाड यांच्या मध्यस्थीने प्रश्न मार्गी
नायब तहसीलदार गायकवाड यांच्या यशस्वी मध्यस्थीने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा निघाला असून, उद्यापासून छोट्या पुलाच्या कामास सुरुवात होणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.
या निर्णयामुळे उत्रदा परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. छोट्या पुलामुळे पैनगंगा नदीला पूर आल्यानंतर पाण्याचा योग्य विसर्ग होण्यास मदत होऊन शेतांमध्ये पाणी तुंबण्याची शक्यता कमी होणार आहे. त्यामुळे भविष्यात शेतीपिकांचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, तहसीलदार सवडे यांनी संबंधित विभागाचे स्थानिक अधिकारी तसेच श्री. खरात यांना शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होणार नाहीत, या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेत सकारात्मक निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आंदोलनातून प्रश्न मार्गी लागल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी ईश्वरराव इंगळे, नवलसिंग इंगळे, प्रल्हाद इंगळे, संतोष इंगळे, निवृत्ती इंगळे, दिपराव इंगळे, सदराम इंगळे, नारायण इंगळे, एकनाथ इंगळे, रमेश कमळीक, सीताराम इंगळे, विजय इंगळे, भगवान इंगळे, सुभाष इंगळे, अशोक शामराव इंगळे, प्रकाश भजनसिंग, तेजराव इंगळे, शिवाजी इंगळे, नवलसिंग किसनराव इंगळे, सदाशिव शंकरराव इंगळे, ईशानदेव सखाराम इंगळे, गजानन चांगदेव इंगळे, ईश्वर भीमराव इंगळे यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!