देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात शासकीय कामकाज सुरू असताना एका व्यक्तीने अचानक गोंधळ घालत कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून कनिष्ठ लिपिकाची कॉलर पकडून मारहाण केल्याची घटना मंगळवारी घडली. ‘तुमच्यामुळे माझी नोकरी गेली,’ असा आरोप करीत संबंधित व्यक्तीने कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्याने कार्यालयातील कामकाजात काही काळ व्यत्यय निर्माण झाला. याप्रकरणी गणेश सिताराम म्हस्के (रा. गिरोली खुर्द, ता. देऊळगाव राजा) याच्याविरुद्ध देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेच्या वेळी बाजार समितीत कार्यरत किशोर सीताराम म्हस्के (वय ५६) हे कनिष्ठ लिपिक रावसाहेब श्यामराव कोल्हे, विलास दगडुजी कव्हळे आणि शिपाई सारिका मिलन राठोड यांच्यासोबत कार्यालयीन कामकाज करीत होते. त्याचवेळी गणेश म्हस्के हा कार्यालयात आला. त्याने उपस्थित कर्मचाऱ्यांना उद्देशून ‘तुमच्यामुळे माझी नोकरी गेली,’ असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
कर्मचाऱ्यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा आक्रमक पवित्रा कायम राहिला. त्याने कनिष्ठ लिपिक रावसाहेब कोल्हे यांच्या शर्टाची कॉलर पकडून मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बाजार समिती कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
शासकीय कामकाज सुरू असताना कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून मारहाण केल्याने कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण झाल्याची नोंद पोलिसांनी केली आहे. याप्रकरणी किशोर म्हस्के यांनी देऊळगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गणेश म्हस्के याच्याविरुद्ध संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक ब्रम्ही गिरी यांनी बाजार समिती कार्यालयात भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर करीत आहेत.














