सिंदखेड राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज):लोणार तालुक्यातील भुमराळा येथे हुंड्यासाठी होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीसह सासू, सासरा आणि दीराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोराखेडी बुद्रुक येथील परमेश्वर बाबासाहेब मोरे (वय ४२) यांची मुलगी रोहिणी हिचा विवाह तीन वर्षांपूर्वी लोणार तालुक्यातील भुमराळा येथील प्रवीण ब्रह्मानंद म्हस्के याच्याशी झाला होता.
विवाहावेळी मुलीच्या वडिलांनी सासरच्यांच्या मागणीनुसार सुमारे एक लाख रुपये रोख व दागदागिने दिले होते. सुरुवातीला संसार सुरळीत सुरू होता. मात्र गेल्या वर्षभरापासून पती प्रवीण म्हस्के, सासरे ब्रह्मानंद आनंदा म्हस्के, सासू विमल ब्रह्मानंद म्हस्के आणि दीर प्रदीप ब्रह्मानंद म्हस्के यांनी “हुंडा कमी दिला” या कारणावरून रोहिणीचा छळ सुरू केला.
पतीसाठी व्यवसायाकरिता चारचाकी वाहन घेण्यासाठी आणखी एक लाख रुपये माहेरून आणण्याची मागणी वारंवार करण्यात येत होती. पैसे न आणल्यास रोहिणीला मारहाण केली जात होती तसेच “पैसे आण नाहीतर घरी येऊ नकोस” अशा धमक्या दिल्या जात होत्या. समेट व्हावा म्हणून मुलीच्या माहेरच्यांनी एकदा दहा हजार रुपयेही दिले, तरीही पैशांसाठीचा छळ थांबला नाही. अखेर २ मार्च २०२६ रोजी सततच्या त्रासाला कंटाळून रोहिणीने गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
या प्रकरणी बीबी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदारांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर शिंदे आणि बीट जमादार रविराज चव्हाण करीत आहेत.
दीड वर्षाचा विश्वराज झाला आईविना…
आत्महत्या केलेल्या रोहिणीला विश्वराज नावाचा दीड वर्षाचा मुलगा आहे. आईच्या मृत्यूने त्याच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं असून, आई-वडील व कुटुंबीयांवर कारवाई झाल्याने आता या चिमुकल्याचा सांभाळ कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे














