देऊळगाव राजा (बुलडाणा कव्हरेज न्युज)शहरातील खोरेश्वर महादेव मंदिर परिसरालगत असलेल्या वॉटर पार्कमध्ये गुरुवारी (दि. ९ एप्रिल) दुपारच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेत २२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे वॉटर पार्कमधील सुरक्षा व्यवस्थेचा भांडाफोड झाला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मृत तरुणाचे नाव शुभम भास्कर सदावर्ते (वय २२, रा. शेवली नेर, जि. जालना) असे असून तो संभाजीनगर येथे एका खासगी कंपनीत कार्यरत होता. कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त देऊळगाव राजा येथे आलेल्या शुभमने मित्रांसोबत वॉटर पार्कमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. मात्र आनंदासाठी घेतलेला हा निर्णय त्याच्यासाठी जीवघेणा ठरला.
मिळालेल्या माहितीनुसार, पाण्यात खेळत असताना शुभम अचानक खोल भागात गेला आणि बुडू लागला. त्यावेळी मदतीसाठी तो झगडत होता. मात्र घटनास्थळी तत्काळ प्रभावी बचावयंत्रणा उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. मित्रांनी त्याला बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. वॉटर पार्कमध्ये प्रशिक्षित लाइफगार्ड होते का? सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का? निष्काळजीपणामुळेच हा बळी गेला का? या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
शुभमच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आईचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. संतप्त नातेवाईकांनी आक्रमक भूमिका घेत “वॉटर पार्क मालकाला अटक झाल्याशिवाय पोस्टमार्टम होऊ देणार नाही” असा इशारा दिला. त्यामुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, देऊळगाव राजा पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून संबंधितांवर गुन्हा दाखल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वृत्त लिहेपर्यंत याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता.














