मलकापूर पांग्रा (बुलडाणा कव्हरेज न्युज):अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेलं पीक गेलं, बँक व खासगी कर्जाचा डोंगर वाढला आणि शेवटी कष्टकरी शेतकऱ्याने जीवनयात्रा संपवली. साखरखेर्डा पोलीस ठाणे हद्दीतील मलकापूर पांग्रा शिवारात बाबुराव श्रीराम देशमुख (वय ६१) यांनी शेतातील उंबराच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी (२९ डिसेंबर) सकाळी उघडकीस आली.
नेहमीप्रमाणे सकाळी शेतात मोटार सुरू करण्यासाठी गेलेल्या बाबुराव देशमुखांचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली व पोलिसांना कळविले. साखरखेर्डा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून मर्ग दाखल करण्यात आला आहे.
यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. त्यातच बँक व खासगी सावकारांचे कर्ज, यामुळे बाबुराव देशमुख मानसिक तणावात होते, अशी माहिती फिर्यादी अमोल संजयराव देशमुख यांनी दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.














