Advertisement Advertisement

बुलढाण्यात दोन दिवसांत दोन धक्कादायक घटना; अल्पवयीन मुलीचे अपहरण, तर विवाहिता बेपत्ता…

बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर घटना घडल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एका प्रकरणात अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले असून, दुसऱ्या घटनेत विवाहिता बेपत्ता झाल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे.

मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील अंजनी बुद्रुक येथे १५ वर्षे १० महिन्यांची वैष्णवी केशव पायघन हिला ६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास गजानन हनुमान चंदनशिव (रा. अंजनी बुद्रुक) याने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. याप्रकरणी वैष्णवीची आई सत्यभामा पायघन (वय ४०) यांच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वसंत पवार करीत आहेत.

दरम्यान, दुसरी घटना बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत खुपगाव येथे घडली आहे. येथील अश्विनी मंगेश खेडेकर (वय २७), रा. अंत्री खेडकर (ह.मु. खुपगाव) या ७ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता “बुलढाणा येथे बाजारासाठी जाते” असे सांगून घराबाहेर पडल्या होत्या. मात्र, सायंकाळ उलटूनही त्या परत न आल्याने कुटुंबीयांनी नातेवाईक व परिचितांकडे शोध घेतला, तरी त्यांचा काहीही मागमूस लागला नाही.

अखेर गणेश गजानन डुकरे (वय २४) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मिसिंगची नोंद केली आहे. अश्विनी यांची उंची सुमारे १६५ सें.मी., वर्ण गोरा, चेहरा लांबट असा आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अंमलदार सोनने करीत आहेत.

या सलग दोन घटनांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!