बिबी (बुलडाणा कव्हरेज न्युज): बीड जिल्ह्यातील पुरुषोत्तमपुरी येथे सुरू असलेल्या अधिकमास यात्रेदरम्यान गोदावरी नदीत भाविकांनी भरलेली बोट उलटल्याने भीषण दुर्घटना घडली. या अपघातात बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील बिबी येथील दोन महिला भाविकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे बिबी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अधिकमास यात्रेनिमित्त पुरुषोत्तमपुरी येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. गोदावरी नदीपात्रात भाविकांना घेऊन जाणारी एक बोट क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्याने अचानक उलटल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत बिबी येथील रहिवासी सौ. प्रमिला शेषराव राठोड (वय ५५) आणि सौ. कांताबाई ज्ञानोबा आंधळे (वय ६०) यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
दरम्यान, या अपघातात काही अन्य भाविक जखमी झाले असून त्यांना तातडीने नदीबाहेर काढण्यात आले. जखमींना उपचारासाठी माजलगाव येथील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती बिबी परिसरात पोहोचताच गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. दोन्ही मृत महिलांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावकऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
या दुर्घटनेमुळे यात्रास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासन व बचाव पथकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबविले











