Advertisement Advertisement

आव्ह्यात चोरट्यांचा धुमाकूळ; १५ दिवसांत ४ ते ५ घरफोड्या, ग्रामस्थांमध्ये दहशत….

मोताळा(बुलडाणा कव्हरेज न्युज) : तालुक्यातील आव्हा गावात गेल्या १५ दिवसांत ४ ते ५ ठिकाणी घरफोडी व दरोड्याच्या घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली असून, गावात रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त वाढवून तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासंदर्भात युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम घोंगटे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी पालकमंत्री मकरंद पाटील यांना निवेदन देत आव्हा गावाच्या सुरक्षेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली.

चोरट्यांनी गावाला केले लक्ष्य….

आव्हा व परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अवघ्या काही दिवसांत गावातील ४ ते ५ घरांना चोरट्यांनी लक्ष्य करून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी जवळच असलेल्या काटी (ता. नांदुरा) येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या दरोडेखोरांनी एका व्यक्तीची हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे आव्हा ग्रामस्थांच्या मनातील भीती आणखी वाढली आहे. रात्रीच्या वेळी घरात राहणेही धोकादायक वाटत असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

पोलीस गस्त वाढविण्याची मागणी….

गावात एकापाठोपाठ एक चोरी व दरोड्याच्या घटना घडत असतानाही धामणगाव बढे पोलीस प्रशासनाकडून पुरेशी दखल घेतली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनातून केला आहे. पोलीस गस्त पुरेशा प्रमाणात होत नसल्याने चोरट्यांचे धाडस वाढल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

आव्हा गावात काही दिवसांसाठी कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त ठेवावा, रात्रीची गस्त वाढवावी तसेच घडलेल्या घटनांचा गांभीर्याने तपास करून आरोपींचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

अनुचित प्रकार घडल्यास पोलीस प्रशासन जबाबदार….

गावात भविष्यात कोणताही अनुचित किंवा गंभीर प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी आग्रही मागणी निवेदनातून करण्यात आली. ग्रामस्थांच्या जिवितास अथवा मालमत्तेस काही धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी धामणगाव बढे पोलीस प्रशासनाची राहील, असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निवेदनावर युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम घोंगटे, शिवसेना तालुकाप्रमुख विजय इंगळे, संतोष घोंगटे, अॅड. विवेक पाटील, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील, देवानंद पाटील, अनिल पाटील, मोहन पाटील, प्रकाश घोंगटे, शालिग्राम पाटील, सुदाम घोंगटे, संदीप पाटील, सुधाकर कुकळे, उमेश घोंगटे, गजानन कुकळे, योगेश महाजन, परमेश्वर मानकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!