डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : डोणगाव शहरात सध्या माकडांचा उच्छाद वाढला असून जंगली माकडांसह तांबड्या बुड्या माकडांनी नागरिकांना हैराण केले आहे. विशेषतः महिला आणि लहान बालकांमध्ये माकडांची मोठी दहशत निर्माण झाली आहे. अशातच तांबड्या बुड्या माकडाने उडी मारल्याने खाली पडलेल्या ८० वर्षीय वृद्धाचा अखेर मृत्यू झाल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी घडली.
डोणगाव येथील रहेमत नगर परिसरात राहणारे लाल खा खासाब (वय ८०) हे सुमारे महिनाभरापूर्वी घरासमोर असताना एका तांबड्या बुड्या माकडाने अचानक त्यांच्या अंगावर उडी मारली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे ते खाली पडले. त्यानंतर त्यांच्यावर खासगी दवाखान्यात उपचार करण्यात आले.
मात्र, या घटनेनंतर त्यांच्या मनात माकडाची मोठी धास्ती बसली होती. माकडाच्या हल्ल्यामुळे झालेल्या या घटनेनंतर ते मानसिकदृष्ट्याही घाबरलेले होते. अखेर १३ ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती परिसरात पसरताच नागरिकांमध्ये, विशेषतः महिला व बालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
डोणगाव परिसरात मोकाट फिरणारी माकडे अचानक घरांमध्ये घुसणे, नागरिकांच्या अंगावर धावून जाणे तसेच लहान मुलांना त्रास देत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. त्यामुळे माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.
माकडांचा कधी कोणावर हल्ला होईल, याचा भरवसा नसल्याने वन विभागाने या मोकाट माकडांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.













