दुसरबीड(बुलडाणा कव्हरेज न्युज) : ग्रामपंचायत दुसरबीडमधील कथित गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्यांनी १५ ऑगस्ट रोजी आत्मदहन करण्याचा इशारा दिल्यानंतर प्रशासनाने तातडीने दखल घेतली. जिल्हा परिषद प्रशासनाकडून चौकशीअंती दोषी आढळणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर नियमानुसार १५ दिवसांत प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आल्याने आत्मदहन आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत उपसरपंच अशोक गुंजाळ, गजानन जगताप आणि शेख तौफीक यांनी ग्रामपंचायतीतील विविध विकासकामे, निधीचा वापर, साहित्य खरेदी, पाणीपुरवठा निधी, आठवडी बाजार हक्काची रक्कम तसेच अन्य आर्थिक व्यवहारांमध्ये कथित अनियमितता झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी यापूर्वीही तक्रारी व निवेदनांच्या माध्यमातून केली होती.
मात्र, अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने त्यांनी १५ ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने तक्रारीची दखल घेत जिल्हास्तरीय चौकशी समिती गठित करून चौकशी केली.
चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) शिवशंकर भारसाकळे यांनी १४ ऑगस्ट रोजी संबंधितांना लेखी पत्र दिले. चौकशी अहवालात दोषी आढळणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध १५ दिवसांच्या आत नियमानुसार प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असे या पत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रशासनाच्या या लेखी आश्वासनानंतर ग्रामपंचायत सदस्यांनी आत्मदहनाचा निर्णय तूर्तास स्थगित केला.
ग्रामसेवकाची यापूर्वीच बदली….
ग्रामपंचायतीतील कथित गैरव्यवहाराची चौकशी व्हावी, या मागणीसाठी अशोक गुंजाळ, तौफिक शेख आणि गजानन जगताप यांनी २० एप्रिल रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषण केले होते. त्यावेळी गटविकास अधिकारी अजित कुमार बांगर यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले होते. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी अशोक बुरकुल यांची बदली करण्यात आली होती.
आता जिल्हास्तरीय चौकशी समितीच्या अहवालानंतर दोषी आढळणाऱ्यांवर १५ दिवसांत प्रशासकीय कारवाई करण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने पुढील कार्यवाहीकडे दुसरबीड ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.













