राजगडच्या शाळेत ३२ विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षक; पालकांचा संताप, १८ ऑगस्टला पंचायत समितीत शाळा भरविण्याचा इशारा…..
डोणगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज) : मेहकर तालुक्यातील बंजारा बहुल राजगड गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतच्या ३२ विद्यार्थ्यांसाठी सध्या केवळ एकच शिक्षक कार्यरत असल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शिक्षकाची नियुक्ती करण्याची मागणी वारंवार करूनही शिक्षण विभागाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
राजगड येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत पूर्वी दोन शिक्षक कार्यरत होते. मात्र, शाळा सुरू झाल्यानंतर एका शिक्षकाचे निधन झाले. त्यानंतर त्यांच्या जागी अद्याप दुसरा शिक्षक देण्यात आलेला नाही. परिणामी, एकाच शिक्षकावर ३२ विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी आली आहे.
शिक्षकाच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला; मात्र त्याची झळ विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला बसू नये, अशी पालकांची भूमिका आहे. शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना पुरेसा शैक्षणिक वेळ देता येत नसून त्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे, एकमेव कार्यरत शिक्षकाला अध्यापनासोबतच मुख्याध्यापक, बीएलओ तसेच इतर प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळत नसल्याने शैक्षणिक नुकसान अधिकच वाढत असल्याची परिस्थिती आहे.
शाळेत शिक्षकाची नियुक्ती करावी, यासाठी पालकांनी शिक्षण विभागाकडे वेळोवेळी विनंती केली. मात्र, मागणीची दखल घेतली जात नसल्याने पालकांचा संताप वाढला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही, तर आता थेट आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.
दरम्यान, १८ ऑगस्ट रोजी मेहकर पंचायत समितीमध्येच आपल्या पाल्यांची शाळा भरविण्याचा निर्णय पालकांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शिक्षण विभाग याकडे गांभीर्याने पाहून राजगडच्या शाळेला तातडीने शिक्षक उपलब्ध करून देणार का, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
“शिक्षकाच्या मृत्यूची शिक्षा विद्यार्थ्यांना का?” असा संतप्त सवाल पालक आणि ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात असून, प्रशासनाने तातडीने शिक्षकाची नियुक्ती करून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे, अशी मागणी जोर धरत आहे.















