Advertisement Advertisement

शेगावात ‘सर’ न म्हणाल्याच्या वादातून विद्यार्थ्यावर लोखंडी रॉडने हल्ला..!सीनियरकडून इंजिनिअरिंग विद्यार्थ्याला बेदम मारहाण…

शेगाव(बुलडाणा कव्हरेज न्युज): कॉलेजमध्ये सीनियरला ‘सर’ न म्हणाल्याच्या कारणावरून विद्यार्थ्यावर लोखंडी रॉडने हल्ला करून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शेगाव शहरात घडली. या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिन्स रमेश वाजगे (वय १९) हे श्री संत गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेज, शेगाव येथे शिक्षण घेत असून सध्या स्वामी विवेकानंद वसतीगृहात वास्तव्यास आहेत. १३ मार्च रोजी सायंकाळी सुमारे ७.३० वाजताच्या सुमारास ते त्यांच्या मित्रांसोबत काशीलानी पेट्रोल पंपासमोरील अंड्याच्या गाडीवर उभे होते.

यावेळी आरोपी ओम टाकले हा त्याचे मित्र गौरव हळदे व सुमित चव्हाण यांच्यासह तेथे आला. तुमच्यापैकी प्रिन्स वाजगे कोण, अशी विचारणा करत ओम टाकले याने फिर्यादीला तू कॉलेजमध्ये जास्त हिरो बनतोस, तसेच मी तुझा सीनियर असूनही तू मला ‘सर’ म्हणत नाहीस व रिस्पेक्ट देत नाहीस, असा जाब विचारला. त्यानंतर आरोपींनी प्रिन्स वाजगे यांना चापट व बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

यानंतर ओम टाकले याने तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत लोखंडी रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर वार केला. या हल्ल्यात प्रिन्स वाजगे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्त्राव झाला. दरम्यान, मारहाण सुरू असताना फिर्यादीला वाचवण्यासाठी त्यांचे मित्र अभिराज अरविंद कदम व यश लखन मलीये हे मध्ये पडले. मात्र आरोपी ओम टाकले, गौरव हळदे व सुमित चव्हाण यांनी त्यांनाही चापट-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मध्ये पडल्यास तुम्हालाही ठार मारू, अशी धमकी देत शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या प्रकरणी शेगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी ओम टाकले, गौरव हळदे व सुमित चव्हाण यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा क्रमांक १६३/२०२६ दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार निलेश गाडगे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!