शिंदी (बुलडाणा कव्हरेज न्युज)सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथील तत्कालीन ग्रामसेवक दिनकर काळे यांना गैरवर्तन व मनमानी कारभार प्रकरणी अखेर निलंबित करण्यात आले आहे. गटविकास अधिकारी (वर्ग–१) अजितकुमार बांगर यांनी १ जानेवारी रोजी ही कारवाई केली. यासंदर्भात ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांकडून वारंवार लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या.
तक्रारींमध्ये ग्रामपंचायतीतील कामकाजात अनियमितता, महिलांशी अपमानास्पद वागणूक तसेच तक्रार केल्यास धमकी देण्याचे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणाची पंचायत समिती स्तरावर चौकशी करण्यात आली असून संबंधित विस्तार अधिकाऱ्यांनी अहवाल सादर केला होता.
चौकशी अहवाल व जिल्हा परिषद सेवा शिस्त व अपील नियमांच्या आधारे दिनकर काळे यांना ग्रामपंचायत अधिकारी पदावरून निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांना सेवा नियमांनुसार इतर कोणतेही काम किंवा व्यवसाय करता येणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.















