बुलढाणा (बुलडाणा कव्हरेज न्युज) – मेरा चौकी ते साखरखेर्डा रोडची अवस्था सध्या अतिशय बिकट झाली असून रस्त्याच्या कामातील हलगर्जीपणामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची दयनीय अवस्था होती. अखेर रस्ता मंजूर होऊन तीन महिन्यांपूर्वी कामाला सुरुवात झाली खरी; मात्र कामाची गती अत्यंत मंद असून दर्जाबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
सदर कामात ठेकेदाराने रस्त्यावर गिट्टीची चुरी टाकून काम अर्धवट सोडल्यासारखी स्थिती निर्माण केली आहे. यामुळे दुचाकीस्वार व वाहनचालकांना प्रवास करताना मोठा धोका निर्माण झाला असून अनेक लहान-मोठे अपघात घडल्याच्या घटना समोर येत आहेत.
याशिवाय, रस्त्यावर पाणी न मारल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. या धुळीमुळे रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांना श्वसनाचे त्रास जाणवू लागले असून आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. पादचारी आणि स्थानिक रहिवासी यांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
नागरिकांच्या मते, सार्वजनिक बांधकाम विभाग, देऊळगाव राजा यांच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून या कामाकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. अभियंते ठेकेदारावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत असून ठेकेदार मनमानी पद्धतीने काम करत असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. काहींनी तर आर्थिक लागेबांध्यांचा संशय व्यक्त केला आहे.
शासनाने या रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला असतानाही काम निकृष्ट दर्जाचे आणि संथ गतीने सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. काम वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावे, तसेच ठेकेदाराच्या कामाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
“कामाकडे दुर्लक्ष का? ठेकेदाराला पाठबळ कुणाचे?”
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कामाकडे दुर्लक्ष का केले आहे? ठेकेदाराला मनमानी करण्यास मोकळीक का दिली जाते आहे? यामागे काही गौडबंगाल आहे का? असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
एकूणच, मेरा चौकी ते साखरखेर्डा रोडवरील कामामुळे नागरिकांच्या जीविताशी खेळ सुरू असल्याची भावना व्यक्त होत असून प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची गरज आहे.














