प्रेमसंबंधाच्या कारणावरून तरुण व आईला मारहाण; १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल….

खामगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): प्रेमसंबंधाच्या कारणावरून एका तरुणाला व त्याच्या आईला लोखंडी रॉड व लाकडी काठ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी एकाच कुटुंबातील १३ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, शेगाव तालुक्यातील गोळेगाव येथील अमोल दहीभात याचे गावातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याने राऊत कुटुंबीयांमध्ये नाराजी होती. त्यातून १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजता संबंधितांनी अमोलच्या घरी जाऊन वाद घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे.


फिर्यादी नारायण हरिभाऊ मोरखडे (वय ५१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अंबादास राऊत व संतोष अंबादास राऊत यांनी अमोल व त्याच्या आईला लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण केली. तसेच महादेव राऊत व इतरांनी अमोलच्या डोक्यावर, नाकावर व तोंडावर काठ्यांनी प्रहार केल्याचा आरोप आहे. अमोलच्या आईशी गैरवर्तन केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
दरम्यान, गावचे पोलीस पाटील प्रकाश मुंडाले यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र वाद चिघळल्याने पुन्हा मारहाण झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कुटुंबातील काही महिला सदस्यांचाही मारहाणीत सहभाग असल्याचा उल्लेख आहे.


या प्रकरणी पोलिसांनी अंबादास राऊत, संतोष अंबादास राऊत, महादेव अंबादास राऊत, चंदू राऊत, श्रीधर राऊत, अक्षय राऊत यांच्यासह एकूण १३ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ११८ (२), १८९ (२), १८९ (४) व ७६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार बाळकृष्ण फुंडकर करीत आहेत.


तसेच संतोष अंबादास राऊत यांच्या फिर्यादीवरून भागवत दहीभात, रुख्माबाई दहीभात, अमोल दहीभात व जनार्दन दहीभात यांच्याविरुद्धही भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल झाल्याने पोलिसांकडून सखोल तपास सुरू असून गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!