Advertisement Advertisement

“आई हा माझा शेवटचा फोन…” म्हणत शेतात टोकाचं पाऊल; आई-भावाच्या डोळ्यादेखत तरुणाचा अंत…

धाड (बुलडाणा कव्हरेज न्युज): “आई, हा माझा तुला शेवटचा फोन आहे…” असे म्हणत बुलडाणा तालुक्यातील करडी येथील ज्ञानेश्वर एकनाथ सपकाळ (वय ३९) यांनी शेतात टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना घडली. सोमवारी (२ मार्च) सायंकाळी साडेसातच्या सुमारास धाड येथील भाग क्रमांक १, गट क्र. ५७ मधील त्यांच्या शेतात हा प्रकार घडला.

आईला शेवटचा फोन केल्याचे ऐकताच काहीतरी अनर्थ होणार असल्याची चाहूल लागताच आई आणि भाऊ घाईघाईने शेताकडे धावले. ते पोहोचेपर्यंत ज्ञानेश्वर यांचा फोन सुरूच होता. समोर आई-भाऊ येताना दिसताच त्यांनी आंब्याच्या झाडाला बांधलेल्या नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेत उडी घेतली. काही क्षणांतच त्यांचा मृत्यू झाला. आई-भावाच्या डोळ्यादेखत घडलेल्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

घटनेची माहिती मिळताच धाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी धाड येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा व भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी रघुनाथ पांडुरंग सपकाळ यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मर्ग दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अंमलदार श्रीकृष्ण चव्हाण करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!