चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज) तालुक्यातील रामनगर येथील २७ वर्षीय शुभम अशोक भगत याचा भानखेडजवळील संजीवनी ढाब्यासमोर झालेल्या भीषण दुचाकी अपघातात मृत्यू झाला. मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. या घटनेने रामनगर गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम भगत हा मंगळवारी रात्री दुचाकी क्रमांक एमएच २० डीए ५५५५ वरून चिखलीच्या दिशेने जात होता. भानखेडजवळील संजीवनी ढाब्यासमोर त्याच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने शुभम याचा उपचारादरम्यान चिखली येथील ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाला.
शुभम हा रामनगर येथील रहिवासी असून, तो आपल्या कुटुंबाचा प्रमुख आधार होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी आणि अवघ्या दोन वर्षांची मुलगी असा परिवार आहे. शुभमच्या वडिलांचे १५ वर्षांपूर्वी निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी शुभमवरच आली होती. अत्यंत कमी वयात कुटुंबाचा आधार असलेल्या शुभमचा अपघाती मृत्यू झाल्याने भगत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शुभमच्या अचानक झालेल्या निधनाची बातमी समजताच रामनगर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात येत आहे. अवघ्या दोन वर्षांच्या मुलीच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरपल्याने परिसरात विशेष हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी अंढेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, अपघाताच्या घटनेचा पुढील तपास सुरू आहे













