Advertisement Advertisement

‘गण गण गणात बोते’च्या गजराने दुमदुमली संतनगरी…खामगाव ते शेगाव पायी वारीत भक्तीचा महापूर; ‘लोटला जनांचा महापूर, शेगाव झाले पंढरपूर’चा अनुभव…

शेगाव (बुलडाणा कव्हरेज न्युज): संत गजानन महाराजांच्या पंढरपूर वारीनंतर दोन महिन्यांनी ‘श्रीं’ची पालखी १९ ऑगस्ट रोजी खामगावहून शेगावच्या संतनगरीत परतली. श्रींच्या दर्शनाची ओढ लागलेल्या लाखो भाविकांनी खामगाव ते शेगाव हे १८ किलोमीटरचे अंतर पायी चालत वारी केली. भाविकांच्या अलोट गर्दीने संपूर्ण मार्ग फुलून गेल्याने ‘लोटला जनांचा महापूर, शेगाव झाले पंढरपूर’ अशी अनुभूती यावेळी आली.

संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे हे ५७वे वर्ष होते. २१ जून रोजी श्रींची पालखी पंढरपूरकडे रवाना झाली होती. २५ जुलै रोजी आषाढी एकादशीचा सोहळा पार पडल्यानंतर पालखीने पंढरपुरात पाच दिवस मुक्काम केला. त्यानंतर २९ जुलैपासून पालखीने शेगावच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू केला. जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर १८ ऑगस्ट रोजी पालखीचा शेवटचा मुक्काम खामगाव येथे झाला.

पहाटेपासूनच भाविकांची पायवाट..

१९ ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता खामगावहून पालखी सोहळ्याला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांसह अबालवृद्ध मोठ्या संख्येने पायी वारीत सहभागी झाले. सुमारे ७०० सेवेकरी व वारकरी दिंडीत सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाचा निनाद, भगव्या पताकांचा फडफडाट, गजराज आणि अश्वांसह निघालेली दिंडी यामुळे संपूर्ण मार्ग भक्तिरसात न्हाऊन निघाला.

ठिकठिकाणी पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. भाविकांसाठी फराळ, पाणी, नाश्ता आणि आरोग्यसेवेची व्यवस्था करण्यात आली होती. विविध संस्था व भक्त मंडळांनी पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले.

‘गण गण गणात बोते’च्या गजराने दुमदुमली संतनगरी…

सकाळी साडेदहा वाजता पालखी शेगावातील गजानन वाटिकेजवळ पोहोचली. येथे काही काळ विश्रांती घेण्यात आली. सायंकाळी चार वाजता पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. ‘गण गण गणात बोते’, ‘जय गजानन’, ‘श्री गजानन’, ‘जय हरि विठ्ठल’, ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या जयघोषाने संपूर्ण शेगाव दुमदुमून गेले.

हजारो भाविकांनी गजानन वाटिकेच्या परिसरात श्रींच्या रजत मुखवट्याचे दर्शन घेतले. शहरातील मुख्य मार्गावरून पालखी शाही थाटात मंदिराकडे मार्गक्रमण करीत असताना रस्त्याच्या दुतर्फा भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.

मंदिरातील रिंगण सोहळ्याने वेधले लक्ष…

पालखी मंदिर परिसरात दाखल झाल्यानंतर अभंग, टाळ-मृदंग आणि नामघोषाने वातावरण भारावून गेले. त्यानंतर झालेला वारकऱ्यांचा रिंगण सोहळा लाखो भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला. मंदिरात श्रींच्या पालखीचे विधिवत स्वागत करून महाआरती करण्यात आली.

पोलिसांचा दिवसभर कडेकोट बंदोबस्त…

पालखी मंदिरात प्रवेश करेपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे दिवसभर पालखीसोबत उपस्थित होते. अप्पर पोलीस अधीक्षक जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्यासह ठाणेदार निमिष मेहेत्रे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसह विशेष पथक, दंगाकाबू पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि अग्निशमन दलाची व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांच्या गर्दीमुळे खामगाव-शेगाव मार्गावरील वाहतूक दुपारी दोन वाजेपर्यंत बंद ठेवून वाहतूक जवळा व जलंब मार्गे वळविण्यात आली.

विशेष म्हणजे यंदा दुचाकींनाही वारीच्या मार्गावर प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे पालखी सोहळ्यात वाहनांचा अडथळा निर्माण झाला नाही. भाविकांनीही वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

जागोजागी पालखीचे स्वागत…

खामगाव ते शेगाव मार्गावर विविध संस्था, शैक्षणिक संस्था आणि भक्त मंडळांकडून पालखीचे स्वागत करण्यात आले. आरोग्य सेवा, चहा, नाश्ता आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. नवोदय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तसेच संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयासमोर पालखीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

भक्तांची लूट होऊ नये याची संस्थानकडून खबरदारी..

शेगावात येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारे आर्थिक लूट होऊ नये, यासाठी संस्थानकडून विशेष काळजी घेतली जाते. भक्तनिवासांची माहिती देणारे फलक शहरात विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. तसेच कोणत्याही विशिष्ट पूजा, अभिषेकासाठी भाविकांवर सक्ती केली जात नाही. ‘रंकापासून रावापर्यंत’ सर्व भाविकांना समान रांगेतून दर्शन घेता येते.

६० दिवसांचा खडतर पण भक्तिमय प्रवास

संत गजानन महाराजांची पालखी तब्बल ६० दिवसांच्या प्रवासानंतर शेगावात परतली. शेगाव-पंढरपूर जाण्याचा सुमारे ७५० किलोमीटरचा प्रवास ३३ दिवसांत, तर पंढरपूर-शेगाव परतीचा सुमारे ५५० किलोमीटरचा प्रवास २७ दिवसांत पूर्ण करण्यात आला.

पंढरपूरकडे जाताना अकोला, वाशीम, हिंगोली, परभणी, बीड, धाराशिव आणि सोलापूर या मार्गावरून पालखीचा प्रवास झाला. परतीच्या प्रवासात सोलापूर, धाराशिव, बीड आणि जालना मार्गे पालखी शेगावकडे परतली.

दोन महिन्यांच्या या भक्तिमय प्रवासानंतर ‘श्रीं’चे शेगावात आगमन होताच लाखो भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. ‘आले वारी करूनी महाराज, शेगावी असे ज्यांचा वास’ अशी भावना मनात ठेवत भक्तांनी आपल्या लाडक्या ‘श्रीं’चे भक्तिभावाने स्वागत केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

WhatsApp Join Group!