चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): शहरातील मुख्य आणि गजबजलेल्या बगाडिया परिसरात गेल्या काही दिवसांपासून महावितरणच्या वीजपुरवठ्याचा अक्षरशः खेळखंडोबा झाला आहे. परिसरातील रोहित्रामध्ये वारंवार तांत्रिक बिघाड होत असल्याने वीजपुरवठा सतत खंडित होत आहे. दर पाच-पाच मिनिटांनी वीज येणे-जाणे सुरू असल्याने नागरिक, दुकानदार आणि व्यावसायिक अक्षरशः हैराण झाले आहेत.
वारंवार वीजपुरवठा खंडित होण्यासोबतच व्होल्टेजमध्ये मोठ्या प्रमाणात चढ-उतार होत असल्याचा आरोप ग्राहकांकडून केला जात आहे. यामुळे घरातील टीव्ही, फ्रिज, कुलर, संगणक यांसह दुकानांमधील डिजिटल उपकरणे आणि वर्कशॉपमधील इलेक्ट्रॉनिक मशिनरी खराब होण्याचे प्रकार घडत आहेत. अनेक व्यावसायिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
वीज येते अन् लगेच जाते; कामाचा खोळंबा…
सततच्या वीज लंपडावामुळे दुकानांमधील तसेच वर्कशॉपमधील कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. वीज काही मिनिटांसाठी आली की पुन्हा अचानक गायब होत असल्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणांवर ताण येत आहे. त्यामुळे व्यावसायिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असून नागरिकांनाही रोजच्या या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
अभियंत्यांच्या उत्तराने ग्राहक संतापलेया…
गंभीर समस्येबाबत ग्राहकांनी महावितरणच्या स्थानिक अभियंत्यांशी संपर्क साधून वारंवार वीज ये-जा होत असल्याची तक्रार केली. मात्र, ‘इलेक्ट्रॉनिक्स मशिन्सचे नुकसान होत असेल तर आधी घरातील आणि दुकानातील वायरिंग व फिटिंग तपासून घ्या,’ असा सल्ला देण्यात आल्याने ग्राहकांमध्ये नाराजी पसरली आहे.
रोहित्रातील बिघाड आणि वारंवार होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या समस्येवर तातडीने उपाय करण्याऐवजी ग्राहकांवरच जबाबदारी ढकलली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
बिलाची वसुली नियमित, वीजपुरवठा मात्र बेभरवशा….
चामहावितरणकडून ग्राहकांकडून दरमहा वीजबिलाची वसुली नियमितपणे केली जाते. मात्र, त्याच ग्राहकांना सुरळीत आणि स्थिर वीजपुरवठा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.
वीजपुरवठ्यातील वारंवार होणारे बिघाड तातडीने दूर करून रोहित्राची योग्य तपासणी व दुरुस्ती करावी, तसेच भविष्यात वारंवार वीज ये-जा होणार नाही यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी बगाडिया परिसरातील नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांकडून होत आहे.














