मेहकर (बुलडाणा कव्हरेज न्युज) – शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या एका पोलीस अंमलदाराची कॉलर पकडून धक्काबुकी केल्याची धक्कादायक घटना मेहकर शहरातील वाटिका चौक परिसरात घडली. या प्रकरणी मेहकर पोलीस स्टेशन येथे तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहकर पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस अंमलदार शिवाजी श्रीराम चिमणे हे ११ फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे १०.१५ ते १०.३० वाजेदरम्यान वाटिका चौकात शासकीय कर्तव्य बजावत होते. त्यावेळी एमएच २८-बीएच-६६६८ क्रमांकाच्या होंडा शाईन मोटारसायकलवरून ट्रिपल सीट जात आरडाओरड करणाऱ्या तरुणांना त्यांनी समज देण्याचा प्रयत्न केला.
मात्र, समज देताच मुजाहीद मुकददर कुरेशी याने पोलीस अंमलदारांची कॉलर पकडून त्यांच्याशी धक्काबुकी केली. त्याच्यासोबत असलेल्या शेख बिलाल शेख अयाज आणि रेहान वाजीद कुरेशी यांनी शिवीगाळ करत गोंधळ घातल्याचे फिर्यादीत नमूद आहे. उपस्थितांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांच्याही अंगावर धावून जात परिसरात गोंधळ निर्माण केला.
या प्रकरणी मुजाहीद मुकददर कुरेशी (वय १८, रा. इमामवाडा, मेहकर), शेख बिलाल शेख अयाज (वय १८, रा. इमामवाडा, मेहकर) आणि रेहान वाजीद कुरेशी (वय १८, रा. माळीपेठ, मेहकर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १३२, २९६, ११५ (२), ३ (५) तसेच मोटार वाहन कायदा कलम १२८ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कांचन जारवाल या करीत आहेत.














