लोणार (बुलडाणा कव्हरेज न्युज): देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास आठ दशके उलटली असली, तरी लोणार तालुक्यातील आदिवासीबहुल मढी गावातील नागरिकांना आजही मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. गावाला जोडणारा रस्ता नसल्याने त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी सोमवारी लोणार तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष गजानन डाखोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रस्त्याअभावी विद्यार्थ्यांचे, विशेषतः मुलींचे शिक्षण अडचणीत येत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तसेच आजारी रुग्ण, गर्भवती महिला आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत असल्याची व्यथा त्यांनी मांडली.
मढी ग्रामस्थांनी यापूर्वीही रस्त्याच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलन केले आहे. निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्यानंतर लोकप्रतिनिधींनी रस्ता निर्माण करण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. त्या आश्वासनावर विश्वास ठेवून ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले होते. मात्र, अद्याप प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविषयी नाराजी वाढली आहे.
आंदोलनाची दखल घेत तहसीलदार भूषण पाटील आणि पोलीस निरीक्षक स्वराज पाटील घोगरे यांनी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली. मुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे या प्रश्नाचा पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले.
मात्र, केवळ आश्वासनांवर समाधान मानण्यास ग्रामस्थांनी नकार दिला आहे. ३० जूनपर्यंत रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली असून, मागणी पूर्ण न झाल्यास १ जुलैपासून उपोषण आणि रस्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याच्या प्रतीक्षेत असलेल्या मढी गावातील नागरिकांच्या संयमाचा बांध आता फुटू लागला असून, प्रशासन या प्रश्नावर किती तत्परतेने कार्यवाही करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
















