चिखली (बुलडाणा कव्हरेज न्युज): तालुक्यातील भरोसा परिसरात वन्यप्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. २२ मार्चच्या मध्यरात्री लांडग्यांनी शेतातील गोठ्यावर हल्ला चढवत तीन बकऱ्या व तब्बल ४० कोंबड्यांचा फडशा पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
भरोसा येथील शेतकरी सुखदेव त्र्यंबक थुटटे यांनी शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन व कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या शेतालगत असलेल्या गोठ्यात बकऱ्या बांधलेल्या होत्या, तर बाहेरील खुराड्यात कोंबड्या ठेवण्यात आल्या होत्या. २२ मार्चच्या रात्री अचानक लांडग्यांच्या कळपाने हल्ला करत गोठ्यातील तीन बकऱ्या ठार केल्या, तसेच खुराड्यातील ४० कोंबड्यांचाही फडशा पाडला.
यापूर्वीही परिसरात लांडग्यांनी एका वासरावर हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना घडली होती, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत संबंधित शेतकऱ्याचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विश्वास वानखेडे, वनरक्षक गजानन पोटे, वनपाल प्रदीप मुंढे तसेच तलाठी मगर यांनी घटनास्थळी धाव घेतली. वनरक्षक गजानन पोटे यांनी पंचनामा करून घटनेची नोंद केली आहे.
दरम्यान, वाढत्या वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे शेतकरी हवालदिल झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत व नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.














